मुंबई । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहे. यातच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख हत्येचे फोटो समोर आल्यानंतर मुंडेंनी राजीनामा दिला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा ट्विट केलं आहे. यामध्ये मुंडे यांनी आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.
ट्विटमध्ये काय म्हणालेत धनंजय मुंडे-
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Discussion about this post