मुंबई । बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाल्याने विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती दमानिया यांनी दिली. तसेच, या भेटीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली.
मात्र, आता यावर स्वतः धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मंत्रालयात बैठकीसाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, ‘अंजली दमानिया या अजित पवारांना भेटल्या आहेत, त्यांनी कागदपत्रे दिली आहेत, मात्र माझ्या राजीनाम्याची अजून कोणी मागणी केलेली नाही. तसेच राजीनाम्यावर मी काही बोलणार नाही, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देतील, त्यांनीच उत्तर द्यावे अशी माझी सुद्धा इच्छा आहे’. असं ते म्हणाले.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले, “संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मी पहिल्या दिवसापासूनच मागणी केली आहे. माध्यमांनी ही बातम्या संतुलन राखून दिल्या पाहिजेत. गेल्या एक महिन्यापासून बीडशिवाय दुसऱ्या बातम्या माध्यमांत दिसत नाही. माध्यमांनी मीडिया ट्रायल जरुर करावी, जर त्यात कोणी मतदार संघातील नेता असेल किंवा मी जरी दोषी असलो तरी मीडिया ट्रायल झाले पाहिजे.
या मताचा मी आहे. संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली त्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन फासावर नेले पाहिजे या माझ्या भूमिकेत आजही कसलाही बदल नाही. असे मुंडे म्हणाले. दरम्यान माध्यमांशी संवाद साधल्यानंतर धनजय मुंडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.















Discussion about this post