मुंबई । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन महाराष्ट्रातील वातावरण प्रचंड तापलेले आहे. या प्रकरणात अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे देखील अडचणीत सापडले आहेत. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशामध्ये धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला असल्याचे वृत्त समोर आले होते. पण धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. मी राजीनामा दिला नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांची एका वृत्तवाहिनीशी बोलताना राजीनामा दिला की नाही हे सांगितले. ‘मला ना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा मागितला. ना मी राजीनामा दिला आहे. माझ्या राजीनाम्याच्या बातम्या तथ्यहीन आहेत. अजित दादांबरोबर विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत कोणतीच चर्चा झाली नाही.’, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले. राजीनाम्याचे वृत्त फेटाळत धनंजय मुंडे यांनी चर्चांना पूर्णविराम दिले आहे.
आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित पवनचक्की खंडणी प्रकरणात थेट मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. १४ जूनला मुंबईतील सातपुडा बंगल्यावर पवनचक्कीच्या आवादा कंपनीकडून धनंजय मुंडे यांनी ३ कोटी रूपये मागितले होते आणि त्या बैठकीत स्वतः धनंजय मुंडे होते, असा दावा सुरेश धस यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे.















Discussion about this post