मुंबई । जालन्यातील लाठीमाराच्या घटनेवरून राज्यात जोरदार पडसाद उमटलेले आहेत. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणावरून सुरु झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली आहे. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच फडणवीस यांनी मराठा आंदोलकांची थेट माफी मागितली.
राज्यात जे काही वातावरण निर्माण झालं आहे आणि जालन्यात जे उपोषण सुरू आहे. त्यावर बैठकीत चर्चा झाली. जालन्यात उपोषणावेळी दुर्देवी घटना घडली. त्यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रूधुराचा वापर केला. ही दुर्देवी घटना आहे. अशा प्रकारच्या बळाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीसांची माफी
माझ्या आधीच्या सत्तेच्या काळात पाच हजार आंदोलने झाली. तेव्हा कधीच बळाचा वापर केला नव्हता. आता बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे, जखमी झाले आहे. त्यांची मी क्षमा याचना करतो. क्षमा मागतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. दोषींवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. या घटनेचं राजकारण होणं योग्य नाही. काही नेत्यांनी तो प्रयत्न केला. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जाणीवपूर्वक लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले असं चुकीचं वातावरण निर्माण करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
Discussion about this post