मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली होती असा मोठा गौप्यस्फोट केला. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
”एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंनी फोन केला. तुम्ही मुख्यमंत्री बना, असे म्हणत मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. मात्र वेळ निघून गेली होती. आम्ही एकनाथ शिंदेसोबत एकत्र येत आहोत हे चित्र जेव्हा स्पष्ट झाले. त्यादिवशी सकाळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेता किंवा त्यांना एखादे पद देता? मी संपूर्ण पक्षच घेऊन येतो. तुम्ही मुख्यमंत्री बना आपण हे सगळे नीट करू”, फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची चित्र आहे.
यावेळी यंदाची निवडणूक भाजपसाठी सोपी नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत फडणवीस म्हणाले, ”कोणतीही निवडणूक सोपी नसते. पण महाराष्ट्रात आमच्यासाठी लोकसभा अग्निपथही नाही. पंतप्रधान मोदींनी एक वातावरण तयार केले आहे. त्यामुळे आम्ही विजय मिळवू. निवडणुकीत आव्हान तर असते. आपण जिंकणारच आहोत, असे समजून चाललो की, आपले जिंकण्यासाठीचे प्रयत्न कमी होतात”, असे फडणवीस म्हणाले.















Discussion about this post