मुंबई । राज्यात येत्या दिवाळीनंतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याचा अंदाज असून याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना चांगल्याच शब्दात दम दिला आहे. वादग्रस्त आणि बेताल वक्तव्ये टाळा, कामावर लक्ष केंद्रित करा आणि विरोधकांच्या आरोपांना कृतीतून उत्तर द्या, अशा स्पष्ट सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील काही मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे पक्षावर सातत्याने टीका होत आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर भूमिका घेत मंत्र्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. अलीकडच्या काळात शिंदे गटातील काही मंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात अनेक वाद निर्माण झाले. या वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असून, विरोधकांना टीकेसाठी आयते कोलीत मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.
मंत्र्यांनी बोलण्यापेक्षा कामावर लक्ष द्या. कोणतीही प्रतिक्रिया देताना किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलताना काळजी घ्या. तुमच्या बोलण्यामुळे पक्षाची मान खाली जाईल असे कोणतेही विधान करू नका, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही विशेष चर्चा झाली. मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सर्व मंत्र्यांना आपापल्या मतदारसंघांमध्ये कामाला लागण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मंत्र्याने आपल्या विभागात केलेल्या कामांचा अहवाल तयार करून तो जनतेसमोर मांडण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
Discussion about this post