मुंबई । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असून यामुळे लवकरच नवे सरकार स्थापन होणार आहे. मात्र त्यापूर्वी महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप ठरलेलं नाही. यातच एकनाथ शिंदेंनी दावा सोडल्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार? की भाजप धक्कातंत्र वापरणार? याची उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
तिन्ही नेत्यांची आज अमित शाह यांच्यासोबत चर्चा –
आज अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्राची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांना दिल्लीत भेटणार आहेत. दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सर्व खासदार आज दिल्लीत आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व खासदारांना आज दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. आज अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अमित शाह यांची भेट घेणार आहे. या बैठकीत मंत्रिपदावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री कोण? फडणवीस की भाजपचे धक्कातंत्र
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे येत्या काही तासांच्या आत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या १७८ आमदारांचे देवेंद्र फडणवीस यांना पाठबळ आहेच. पण भाजप धक्कातंत्रामध्ये तरबेज आहे. राजस्थान आणि हरियाणामध्ये भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी नवख्या चेहऱ्यांना संधी दिली होती. आता महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात भाजप सत्तेची चावी कुणाच्या हाती देणार? याची चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. काही तासांत महाराष्ट्राचा बॉस कोण होणार? यावरुन पडदा उठणार आहे.















Discussion about this post