दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला आघाडी मिळताना दिसत आहे. तर आम आदमी पार्टी दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार हे चित्र दुपारपर्यंत जवळपास स्पष्ट होईल. आतापर्यंत भाजप ४६ जागांवर आणि आप २३ जागांवर आघाडीवर आहे. सुरूवातीच्या कलानुसार भाजप मुसंडी मारताना दिसत आहे, तर सत्ताधारी आप पिछाडीवर पडताना दिसत आहे. तर काँग्रेसला अद्याप एकाही जागावर आघाडी मिळवता आलेली नाही.
दिल्ली विधानसभेच्या कालकाजी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री अतिशी मार्लेना विरुद्ध अलका लांबा विरुद्ध रमेश बिधुरी अशी तिरंगी लढत होत आहे. या मतदारसंघात अगदी चुरशीची लढत सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीच्या मतमोजणीत कालकाजी मतदारसंघातून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर पडल्या आहेत. तर भाजपचे रमेश बिधुरी पुढे आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या अलका लांबा तिसऱ्या स्थानावर आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान, कालकाजी मतदारसंघातील भाजप उमेदवार रमेश बिधुरी म्हणाले की, ”…केजरीवाल दोनदा जिंकले कारण त्यांनी मोफत भेटवस्तू वाटल्या आणि खोटी आश्वासने दिली. पण गेल्या १० वर्षात ते उघड झाले. जर कालकाजीच्या लोकांना विकास हवा असेल तर ते आतिशीला निरोप देतील. ही आघाडी (कालकाजीकडून) कालकाजीच्या लोकांचा आशीर्वाद आहे. केजरीवाल यांनी गेल्या १० वर्षात दिल्लीत कोणतेही काम केले नाही. मला वाटते की आप-दा जाणार आहे आणि भाजप सत्तेत येईल… आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत, मुख्यमंत्री सारख्या कोणत्याही पदासाठी नाही.”
काँग्रेस उमेदवार अल्का लांबा यांची प्रतिक्रिया
दिल्ली निवडणुकीच्या ट्रेंडवर, कालकाजी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अलका लांबा म्हणाल्या, “दिल्ली दिल्लीकरांच्या गुन्हेगारांना माफ करणार नाही. मला माहित नाही की कोण फायदेशीर स्थितीत आहे आणि कोणाला नुकसान सहन करावे लागेल; पण ज्यांनी दिल्लीचे नुकसान केले, त्यांचे हे नुकसान आहे…”. पुढे त्या त्यांनी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात, राहुल गांधींनी कालकाजीमध्ये आम्हाला बळ दिले, ज्यामुळे आमचे मनोबल वाढले याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया देखील दिली.
Discussion about this post