नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली आज सोमवारी संध्याकाळी भयंकर स्फोटाने हादरली आहे. दिल्लीतील लाल किल्ला जवळील मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या एका भीषण स्फोटामुळे आठ लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जखमी झाले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. दरम्यान या स्फोटाच्या काही दिवस आधीच जम्मू-काश्मीरपासून ते फरीदाबादपर्यंत पसरलेल्या ‘डॉक्टरांच्या वेशातील’ एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा सुरक्षा यंत्रणांनी पर्दाफाश केला होता.
सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये मोठ्या तीव्रतेचा स्फोट झाला. या स्फोटानंतर आसपासच्या अनेक वाहनांनी पेट घेतला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. लाजपत राय मार्केटमधील काही भागांना आग लागली, तर जवळच्या जैन मंदिराच्या आणि आसपासच्या दुकानांच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले.
अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. दिल्ली पोलीस आणि विशेष सेलची पथकेही तपास करत आहेत. या दुर्घटनेत आठ लोकांचा मृत्यू झाला असून २४ लोक जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून या घटनेची सविस्तर माहिती घेतली.
या स्फोटानंतर देशभरात सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. शहरातील रेल्वे स्टेशन, मॉल्स, धार्मिक स्थळे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, तसेच संवेदनशील भागांमध्ये पेट्रोलिंग आणि नाकाबंदी तीव्र करण्यात आली आहे.
दुसरीकडे, उत्तर प्रदेशातही हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस आणि प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. त्यांनी सर्व प्रमुख ठिकाणे, धार्मिक स्थळे, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी कठोर पाळत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.















Discussion about this post