जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये योग केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही सर्व योग केंद्र विद्यापीठाच्या योग मार्गदर्शन केंद्राशी समन्वय साधून योगाबाबत जनजागृती करतील.
सन २०१७ मध्ये विद्यापीठात योग मार्गदर्शन केंद्राची स्थापना झाली आहे. या केंद्रामार्फत योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु असून लवकरच पदव्युत्तर पदविका व एम.ए. योग शास्त्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. भारताच्या आयुष मंत्रालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये योग केंद्र सुरु करण्याचा आग्रह धरला आहे. त्यादृष्टीने कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विद्यापीठाशी संलग्नित प्रत्येक महाविद्यालयात योग केंद्र स्थापन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विद्यापीठाने महाविद्यालयांसाठी कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांच्या स्वाक्षरीने परीपत्रक काढले आहे. विद्यापीठाच्या योग केंद्राच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या महाविद्यालयातील योग केंद्राने विविध उपक्रम राबवावे असे अपेक्षित आहे.
त्यासाठी विद्यापीठाकडून काही साहित्य, योग पुस्तिका उपलब्ध करुन दिल्या जातील. या योग केंद्राचे नियंत्रण महाविद्यालयाचे क्रीडा संचालक/ विद्यार्थी विकास अधिकारी/ रासेयो कार्यक्रम अधिकारी यांचेकडे राहील. या योग केंद्राचा फायदा नॅक मानांकनासाठी तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमासाठी होणार आहे. दि. २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा होणार असून त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना परीपत्रक पाठवून या केंद्राविषयीचे सविस्तर निर्देश दिले आहेत अशी माहिती योग मार्गर्शन केंद्र प्रमुख इंजि.राजेश पाटील यांनी दिली.
Discussion about this post