जळगाव । जळगाव तालुक्यातील नांद्रे येथे एका तरुणाला तिघांना जबर मारहाण करत त्याच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड घालून त्याला गंभीर जखमी केले होते. दरम्यान, यातील जखमी तरुणाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. अनिल भगीरथ सोनवणे (वय ३९, रा.नांद्रा बुद्रुक ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून याबात जळगाव तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, अनिल सोनवणे हा तरुण आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, बहिणी यांच्यासह राहत होता. शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तो गावामध्ये एका पान टपरी समोर उभा असताना तेथे संशयित आरोपी संदीप कैलास सोनवणे, कैलास दौलत सोनवणे, गुरुप्रसाद दौलत सोनवणे हे आले.
त्यांनी अनिल सोनवणे यांच्याशी वाद घातला. त्या वादातून तिघांनी अनिल सोनवणे याला बेदम मारहाण केली. तसेच लोखंडी सळई डोक्यात मारून गंभीर जखमी केले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला जळगाव येथे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला आहे.
यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे नेण्यात आला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच् त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post