अलीकडे प्रेमप्रकरणात गुन्हे घडत असल्याचे दिसून येत आहे. प्रेमासाठी तरुण आणि तरुणींकडून काही धक्कादायक पाऊलेही उचलली जात आहे. यातच प्रेम विवाहला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीसह तिच्या प्रियकराने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील वडाची वाडी येथे हा प्रकार घडला आहे. या मारहाणीत वडील गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पळून जाऊन लग्न करण्यास विरोध होईल. मात्र वडिलांचे पाय तोडले तर त्यांचा अडथळा येणार नाही, असे म्हणून प्रेयसीने प्रियकराच्या मदतीने वडिलांचे पाय तोडण्याचा कट रचला. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला असून पोटच्या मुलीनेच बापाची सुपारी दिल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुलगी साक्षी व तिचा प्रियकर आणि त्याचे तीन साथीदार अशा एकूण पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
साक्षी शहा हिचे चैतन्य सोबत प्रेमसंबंध होते. साक्षी ही पुण्याला दुकानाचे साहित्य आणायला गेली होती. सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास बसने शेटफळ (ता. माढा) येथे आली. तेथून आणण्यासाठी वडील कार घेऊन गेले होते. रस्त्यात वडाची वाडीजवळ लघुशंकेचे निमित्त करून तिने गाडी थांबवण्यास सांगितले. मागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी त्यांच्या पायावर मारायला सुरुवात केली. डोक्यात खोऱ्याचा दांडा मारला. ते रक्तबंबाळ झाले. तेव्हा मारेकरी पसार झाले.
सध्या मुलीच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकरणी पाच जणांवर मंगळवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाचही संशयितांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
Discussion about this post