मुंबई । सोने चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या चार दिवासापासून सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली. मात्र आज शुक्रवारी म्हणजेच दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा सोन्याला झळाळी आली आहे.
आज सकाळी वायदे बाजारात MCX वर सोनं आज 760 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानुसार आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 77,400 रुपयांवर स्थिरावलं आहे. शनिवारी दसरा आहे. दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
तर, आज चांदी 766 रुपयांने महागली असून 91,070 रुपयांवर स्थिरावली आहे. काल चांदी 90,304 रुपयांवर पोहोचली होती. सोने ही नेहमीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे. हा महिना सण-उत्सावाचा असल्याने सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पहायला मिळते.
आज देशभरात नवरात्रीची महानवमी साजरी होत आहे. नवरात्रीच्या या खास मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्यासाठी एक मोठी संधी आहे. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट नोंदवण्यात आली आहे. सध्या भारतात सोन्या-चांदीचा भाव नव-नवीन उच्चांक गाठत आहे.