छत्रपती संभाजीनगर । छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगरमध्ये राहणाऱ्या बड्या उद्योगाच्या घरावर दरोडा पडला. यामध्ये दरोडेखोरांनी तब्बल 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी, असा कोट्यवधींचा ऐवज लंपास केला असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संतोष लड्डा यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी आहे. त्याला भेटण्यासाठी लड्डा कुटुंब आठ दिवसांपूर्वी परदेशात गेले होते. लड्डा कुटुंब विदेशात असल्याचा फायदा घेत सहा दरोडेखोरांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे.
दरोडेखोरांनी घरात असलेल्या ड्रायव्हर आणि केअरटेकरच्या हातपाय बांधून त्याला बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला. केअरटेकरच्या डोक्यावर बंदूक ठेवत धमकी देत त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली आणि मौल्यवान दागिने व चांदी चोरून नेले. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 8 किलो सोने आणि 40 किलो चांदी दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं असून त्यावरून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे वाळूज परिसरातील उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.















Discussion about this post