भुसावळ । दादर – नंदुरबार ही गाडी नंदुरबार येथून भुसावळपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी भुसावळहून आणि भुसावळ मार्गे नंदुरबारला जाण्यासाठी एकूण २२ गाड्या होत्या. त्यात आता पुन्हा एका गाडीची भर पडून ही संख्या २३ झाली. यापैकी तीन गाड्या नंदुरबार मार्गे मुंबईला जाणाऱ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
दादर-नंदुरबार ही गाडी दर शुक्रवारी नंदुरबारला येते. या गाडीचा आता भुसावळपर्यंत विस्तार केला आहे. तसा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवला आहे. त्यामुळे ही गाडी दादरहून नंदुरबार मार्गे भुसावळला येईल. पुन्हा त्याच मार्गे प्रवास करेल. यामुळे भुसावळ, जळगाव परिसरातील प्रवाशांची सोय होईल. यापूर्वी नंदुरबारमार्गे मुंबईत जाण्यासाठी दोन रेल्वे गाड्या होत्या. त्यात आता तिसऱ्या गाडीची भर पडली.
विशेषतः भुसावळातून नंदुरबारला जाणाऱ्यांची सोय होईल. दरम्यान, यापूर्वी भुसावळ मार्गे आणि भुसावळ येथून सुटणाऱ्या गाड्या मिळून नंदुरबारला जाणाऱ्या प्रवासी गाड्यांची संख्या २२ होती. त्यात आता भुसावळ-नंदुरबार-दादर गाडीने अजून एका गाडीची भर पडली. एकूण २३ पैकी ९ गाड्या दररोज धावणाऱ्या आहेत. दरम्यान यापूर्वी अमळनेर येथील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी जळगाव येथे किंवा धुळे येथे जावे लागत होते. यात ज्येष्ठ प्रवाशांचे हाल होते होते; पण आता दादर-नंदुरबारचा विस्तार भुसावळपर्यंत झाल्याने प्रवाशांना थेट अमळनेर येथून नंदुरबार, सुरत मार्गे मुंबईला जाता येणार असल्याने त्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे
Discussion about this post