बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, ‘मोंथा’ असे नामकरण झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार आहे. आगामी दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे.
अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही समुद्रात सध्या हवामान प्रणाली सक्रिय आहेत. त्यापैकी बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. मोंथा असे नाव असलेले हे चक्रीवादळ वायव्येकडे सरकून आज मंगळवारी (२८ ऑक्टोबर) आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांना रेड अलर्ट, तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे.
विदर्भात पुढचे तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर व मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यानंतर वातावरण निवळेल. अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.















Discussion about this post