इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावादरम्यान भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. सौदी अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने भरलेलं एक जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे पोहोचलं आहे. लायबेरियाच्या झेंड्याखाली नोंद असलेलं हे जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग काढत भारतात दाखल झालं.
शेनलाँग सुएझमॅक्स नावाच्या या जहाजाने १ मार्च रोजी सौदी अरेबियाच्या रास तनुरा बंदरावर कच्चे तेल भरले आणि ३ मार्च रोजी हे जहाज या बंदरावरून निघाले. लॉयड्स लिस्ट इंटेलिजेंस अँड टँकर ट्रॅकर्स या सागरी डेटा फर्म्सच्या मते, ८ मार्च रोजी त्याचे शेवटचे स्थान होर्मुझच्या सामुद्रधुनीत होते. त्यानंतर जहाज रडारवरून गायब झाले होते. धोक्याच्या क्षेत्रातून जाताना शोध टाळण्यासाठी जहाजाने आपली सिग्नल प्रणाली बंद ठेवली होती.
इराणकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या समुद्री हद्दीजवळ आल्यानंतर जहाजाचा सिग्नल पुन्हा सक्रिय करण्यात आला आणि त्यानंतर ते ट्रॅक करण्यात आलं. काही दिवसांच्या प्रवासानंतर हे जहाज अखेर मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचलं. या जहाजामध्ये सुमारे १,३५,३३५ टन कच्चं तेल असल्याची माहिती मिळाली आहे.
मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठा आणि समुद्री व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना हे जहाज सुरक्षितपणे भारतात पोहोचणं महत्त्वाचं मानलं जात आहे.















Discussion about this post