जळगाव । जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून एकूण ६० गावांतील ४,१४६ शेतकरी बाधित झाले आहेत. तर सुमारे २११६.६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये पारोळा तालुक्यात सर्वाधिक १९२५.५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे.
काही दिवसापूर्वी हवामान विभागाने दिलेल्या येलो अलर्टनंतर अमळनेर, पारोळा आणि चोपडा तालुक्यांमध्ये गहू, मका, ज्वारी, बाजरी, कांदा, केळी आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या
अमळनेर तालुका – १७ गावांतील २७२ शेतकरी बाधित झाले आहेत. मका (९३ हेक्टर), ज्वारी (१०), बाजरी (३३), पपई (१०.७०) अशा एकूण १४६.७० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
पारोळा तालुका – ३८ गावांतील ३८०३ शेतकरी बाधित झाले आहेत. गहू (१२६), मका (६६), ज्वारी (५७७.५०), बाजरी (३२१), कांदा (६८), पपई (३६), फळबागा (१२८) अशा एकूण १९२५.५० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.
चोपडा तालुका – ५ गावांतील ७१ शेतकरी बाधित झाले आहेत. मका (४२.५०), पपई (०.६०) अशा एकूण ४४.४० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे..
भुसावळ तालुक्यातील मोढळा, खंडाळा, शिदी आणि सुरवाडे भागातही अवकाळी पावसाचा जोरदार प्रकोप झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. लवकरात लवकर पंचानामा करुन शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Discussion about this post