धुळे । राज्यात पावकाळी अवकाळी पावसाचे ढग कायम असून मागच्या काही दिवसापासून धुळे जिल्ह्यात हजारो हेक्टर शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कष्टाचे पीक मातीमोल झाले असून यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
गेल्या आठवड्यापासून धुळ्यात पावसानं हजेरी हजेरी लावली. झालेल्या अवकाळी पावसाने शिंदखेडा तालुक्यात १२२ गावामधील ४६ हजार २८६ हेक्टर, तर शिरपूर तालुक्यातल्या ३४ गावातील एक हजार ५०५ आणि साक्री तालुक्यात ९ गावातील १४९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. धुळे तालुक्यातही शेकडो हेक्टर शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे.
यामध्ये कापूस, मका, बाजरी, खरीप ज्वारी आणि तूर या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतातील पिके पाण्यात बुडाली असून, तर काही भागांत वार्याच्या तीव्र झोतामुळे पिके आडवी होऊन जमिनीत मिसळली आहेत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तत्काळ नुकसान पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. त्यानुसार प्राथमिक अहवाल तयार करण्यात येत आहेत. काही गावांमध्ये पंचनामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून, उर्वरित ठिकाणी ते युद्धपातळीवर सुरू आहेत.















Discussion about this post