उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील सौरभ-मुस्कानचे प्रकरण ताजे असताना महाराष्ट्रातील एका सॉफ्टवेअर व्यावसायिकाने बेंगळुरू येथील त्याच्या घरी आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून ठेवला.
यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पण हत्येनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी पुण्याजवळून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. गौरी अनिल सांबेकर (वय-32) असे पीडितेच्या नाव आहे. तर राकेश राजेंद्र खेडकर (वय 36) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश खेडकर हा महाराष्ट्रातील आहे. तो सॉफ्टवेअर प्रोफेशनमध्ये बंगळुरूमध्ये कार्यरत आहे. आरोपी राकेश आणि गौरी यांच्यात किरकोळ कारणातून अनेकदा वाद होत होते. बुधवारी रात्री जेवण करत असताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर पत्नी गौरीने आधी राकेशला मारले. यानंतर संतापलेल्या राकेशने किचनमधील चाकू घेऊन गौरीवर हल्ला केला.
त्याने तीन वार करत गौरीला रक्ताच्या थारोळात पाडले. यानंतर तिचा गळा चिरल्याचं सांगितले जात आहे. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले. गुरूवारी ही घटना उघडकीस आली. मात्र मृतदेहाचे खरंच तुकडे केले होते का? याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिला नाही. हत्येनंतर आरोपीनं गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि ही सुटकेस घरातील बाथरुममध्ये नेऊन ठेवली.
हत्येनंतर आरोपी राहत्या घरातून फरार झाला. बंगळुरू सोडल्यानंतर त्याने घरमालक आणि सासरच्यांना फोन करून पत्नीला मारल्याची माहिती दिली. सासू-सासऱ्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर तपास सुरू झाला. पुण्यातून राकेश याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
Discussion about this post