जळगाव | राशी ६५९ या बियाण्याची विक्री ठरलेल्या ८६४ रुपयांच्या किमतीत न करता १२०० रुपयांमध्ये विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकाला चांगलेच महागात पडले. काही दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या पथकाकडून म्हसावद येथील कृषी विक्रेत्याला रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी आता कृषी विभागाने कृषी केंद्र चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांची कृत्रिम टंचाई दाखवून अनेक बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे जादा दराने विक्री होत असल्याचे प्रकार घडत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी कृषी विभागाकडून १६ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकाकडून गेल्या आठवड्यात म्हसावद येथील भूषण कृषी केंद्रावर धाड टाकली होती. या ठिकाणी ८६४ रुपयांच्या बियाण्याची विक्री १२०० रुपयांमध्ये होत असल्याचा प्रकार घडला होता.
या प्रकरणी बियाणे निरीक्षक तथा मोहीम अधिकारी विजय पवार यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुशील विठ्ठल महाजन (रा. खर्ची, ता. एरंडोल) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून संबंधिताचा कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले















Discussion about this post