जळगाव । शेतकऱ्याचे पांढरे सोने असलेल्या कापसाला यंदा खूपच कमी दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामात साडेसात हजाराच्या वर कापसाचे भाव गेलेच नाही. यात आता पुन्हा कापसाचे दर कोलमडले असून कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून आता मिळेल त्या भावात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
जळगावात सध्या कापसाच्या खासगी बाजारपेठेत चांगल्या कापसाला ६४०० ते ६६५० रुपये दर मिळाले होते. एकंदरीत कापसाला हमीभावाच्या कमी दर मिळत असल्याची स्थिती असून यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
यंदा कापसाचा हमीभाव ७ हजार २०० रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आला होता. प्रत्यक्षात शासनाचे खरेदी केंद्र सुरू नसल्याने कापसाला ६ हजार ४०० ते ६ हजार ६५० रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. यामध्ये उत्पादन खर्च पदरी पडत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आता मिळेल त्या भावात कापसाची विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक झालं सहन करावी लागत आहे.
शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवणूक करीत आहेत. मात्र, कापूस सांभाळावा तरी किती दिवस हा प्रश्न कापूस उत्पादकांना सतावत आहे.
Discussion about this post