जळगाव : यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने कापसासह सर्वच पिकांचे नुकसान झाले. उडीद, मूग, सोयाबीन तसेच मक्याचे देखील उत्पन्न कमी आले आहे. याच दरम्यान कापसाच्या उत्पन्नात देखील घट झाली असून आता हमीभावापेक्षा देखील कमी दराने कापूस खरेदी केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाची सध्या वेचणी सुरू आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकरी कापूस विक्रीसाठी बाजारात घेऊन जात आहे. मात्र, खाजगी व्यापाऱ्यांकडून कापसाला ६४०० ते ६८०० एवढा दर दिला जात आहे. हा दर हमीभावापेक्षा कमी खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. गत वर्षी देखील कापसाला अपेक्षित दर मिळाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवला होता. यंदा देखील सुरवातीपासूनच कमी दर मिळत आहे.
गेल्यावर्षी नुकसान सोसावे लागल्यानंतर यंदा सुरुवातीला जोमात असलेले कापसाचे पीक अतिवृष्टीने उत्पन्नात देखील मोठी घट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातच कापसाला दर मिळत नसल्याने लागलेला खर्च देखील निघतो कि नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे.