– पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. ४ : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत कापूस खरेदीसाठीची मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे, अशी माहिती निवेदनाव्दारे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत दिली.
शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार संबंधित विभागांनी केंद्र शासनाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. या मागणीचा सकारात्मक विचार करून केंद्र शासनाने कापूस खरेदीसाठीची मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.
हमीभावाने हरभरा खरेदी प्रक्रिया १ मार्च २०२६ पासून राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. हरभऱ्यासाठी प्रती क्विंटल रुपये ५,८७५ इतका हमीभाव निश्चित करण्यात आला असून शेतकऱ्यांची नोंदणी व खरेदी प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्यातील कापूस व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री रावल यांनी केले.















Discussion about this post