कोल्हापूर । राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती आणि तर महायुतीकडून शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. येथील प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून, दोन्ही पक्ष एकमेकांवर चिखलफेक करत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या पार्श्वभूमीवर खासदार संजय मंडलिक यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले आहे. आताचे महाराज हे खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आहेत. कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद उद्भवून सत्ताधारी महायुतीची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले संजय मंडलिक?
खासदार संजय मंडलिक चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत म्हणाले की, आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आले आहेत. आपण कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहोत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला. कारण, ही शाहू महाराजांची भूमी आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी पुरोगामी व समतेचा विचार जपला व शिकवला. या जिल्ह्यात जन्मलेल्या प्रत्येक महिला व पुरुषाच्या जन्मजात डीएनएमध्ये हवेत व पाण्यातही शाहूंचे गुण आहेत.