मुंबई । महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचे चक्र अद्यापही सुरूच असून अशातच आता एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी वादग्रस्त विधान केले आहे.सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं विधान संजय शिरसाट यांनी केल्यान पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अकोल्यात सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटनासाठी आलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी महायुती सरकारची पुन्हा एकदा कोंडी केली आहे. अलीकडेच वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंकडून खातं काढून टाकण्यात आले. इतकेच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत तंबी दिली होती. असे असतानाही मंत्री संजय शिरसाट यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट ?
“‘आपल्या भागातील वसतिगृहासाठी निधीची मागणी करा. वसतिगृहाला पाच, दहा, पंधरा कोटींचा निधी लागत असेल तरी तो मागा, आपण लगेच मंजूर करू. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?,” असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाट यांनी केलं आहे. शिरसाट यांच्या या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मंत्र्यांच्या या बेताल वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. यावेळी व्यासपीठावर भाजप आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते.
दरम्यान, गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यात १२० वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी एक हजार २०० कोटी रुपयांच्या निधीची तरतुदही करण्यात आली आहे. खेड्यापाड्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुविधा अधिक व चांगल्या प्रमाणात मिळणे गरजेचे असल्याने १२० वसतिगृहांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलामंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथम राज्यातील वसतिगृहाची पाहणी केली होती, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच संजय शिरसाट यांचा पैशांची बॅग सोबत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर त्यांच्या वर मोठ्या प्रमाणात टिका देखील करण्यात आली होती. त्यांनतर आता पुन्हा एकदा शिरसाट यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Discussion about this post