जळगाव । जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून सतत पाऊस हजेरी हजेरी लावत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे खरिपातील पिकांना फटका बसताना दिसत आहे. यामध्ये उडीद पिकाला मोठा फटका बसला आहे.
आधीच पावसाचा मोठा खंड पडल्याने उडीद पिकापासून फार उत्पादन मिळण्याची आशा संपुष्टात आली आहे. त्यात ऐन पीक काढणीवर आले असताना पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे परिपक्व अवस्थेतील उडीद पीक हातचे वाया चालल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग, तूर आणि चवळी या कडधान्य वर्गीय पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ४६ हजार ४१० हेक्टर आहे. प्रत्यक्षात यंदाच्या खरिपात कडधान्य पिकांची पेरणी सात टक्क्यांनी घटून ४३ हजार १२० हेक्टरपर्यंत घसरली आहे. एकमेव तुरीचे क्षेत्र ३६ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात उडीद पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १६ हजार १८१ हेक्टर इतके आहे.
प्रत्यक्षात, यंदा १४ टक्क्यांनी पेरणी घटल्याने उडदाचे क्षेत्र १३ हजार ८९० हेक्टपर्यंत घसरले आहे. पावसाचे उशिरा आगमन झाल्याने यंदा शेतकऱ्यांना उडीद पिकाची वेळेवर पेरणी करता आली नाही. तशात ऐन वाढीच्या आणि फुलोरा अवस्थेत पावसाने महिनभराची दडी मारल्याने उडीद पिकाच्या वाढीवर आणि शेंगांच्या प्रमाणावर बराच परिणाम झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नाही, अशी परिस्थिती आहे.
दरम्यान, ऐन तोंडाशी घास आल्यानंतर पावसाची अधुनमधून हजेरी लागत असल्याने परिपक्व अवस्थेतील उडीद पीक काढण्याची थोडीही संधी मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. काही ठिकाणी शेंगांमधील दाण्यांना कोंब फुटू लागल्याचे निदर्शनास आले आहे. आता पावसाने उघडीप दिली तरी पीक खराब झाल्याने उडदाला बाजारात अपेक्षित भाव मिळण्याची शक्यता मावळली आहे.















Discussion about this post