जळगाव । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी पक्षाची साथ सोडली आहे. त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.
प्रतिभा शिंदे यांनतर लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश घेणार असल्याची माहिती समोर आलीय. यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभेच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर गलितगात्र अवस्था झालेल्या पक्षाला सावरण्यासाठी काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्यातील सात जणांची नुकतीच नियुक्ती केली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची चांगली ताकद वाढण्याची आशा काँग्रेस बाळगून होती. प्रत्यक्षात, दुसऱ्यांदा प्रदेश उपाध्यक्षपदाची संधी मिळालेल्या प्रतिभा शिंदे यांनी राजीनामा देऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील सातपुडा भागातील आदिवासी समाजासाठी मोठ काम केलं आहे.
प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवून दिला. राजीनाम्याचे नेमके कारण त्यांनी पत्रात नमूद केलेले नाही. मात्र, मंगळवारी जळगावमध्ये आपल्या पुढील वाटचालीविषयीची भूमिका त्या पत्रकारांसमोर जाहीर करणार आहेत. त्यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. यातच त्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीय.
Discussion about this post