सांगली । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अशातच आता सांगलीच्या मिरजमध्ये काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आजी-माजी सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी साथ सोडली आहे. या सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. यामुळे मिरजमधील काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. अचानक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने राजीनामे दिल्यामुळे सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
जनसुराज्य शक्ती पक्षाकडून काँग्रेसला खिंडार पाडण्यात यश आले आहे. मिरज तालुक्यातील सोनी करोली एम येथील आजी-माजी सरपंच, उपसरपंचांसह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह आजी-माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षांमध्ये प्रवेश केला.
आगामी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून मिरज तालुक्यासह जिल्ह्यामध्ये जोरदार पक्ष बांधणी करण्यात येत आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केल्यामुळे सांगलीमध्ये या पक्षाची ताकद चांगलीच वाढली आहे. पण पदाधिकाऱ्यांनी अचानक रामराम ठोकल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मिरजमध्ये काँग्रेसची ताकद कमी झाली आहे.
Discussion about this post