मुंबई । शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार मिशन टायगर सुरू आहे. मिशन टायगरच्या माध्यमातून शिंदे गट एक एक करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना आपल्या गटामध्ये घेत आहे. पुण्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा हात सोडत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलं. यांनतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेनं मराठवाड्यात काँग्रेसला दुसरा धक्का दिला आहे. हिंगोली विधानसभेत काँग्रेसकडून सलग ३ वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे नेते भाऊराव पाटील गोरेगावकर आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. लवकरच हिंगोलीमध्ये गोरेगावकर यांचा पक्षप्रवेश सोहळा देखील पार पडणार असल्याची माहिती शिवसेनेसह गोरेगावकरांच्या समर्थकांनी दिली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला स्वतः एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून भाऊराव पाटील गोरेगावकर यांची उमेदवारी निश्चित झाली असताना अचानक उद्धव ठाकरेंनी हिंगोली विधानसभेची जागा सोडून घेत रूपाली पाटील गोरेगावकरांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली होती. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या गोरेगावकर यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. मात्र या निवडणुकीत रूपाली पाटील गोरेगावकरांसह भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा देखील पराभव झाला होता.
Discussion about this post