जळगाव | जिल्हा वार्षिक योजनेत केल्या जाणाऱ्या कामांची गुणवत्ता वाढावी व वेळेवर गतीने काम पूर्ण करणे यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा भर आहे. यासाठी जिल्ह्यातील शाखा अभियंता उप अभियंता, कनिष्ठ व स्थापत्य अभियंत्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आज घेण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजना कामांची गुणवत्ता वाढ कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाजकल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते. जिल्ह्यातील नगरपालिकेने सर्व मुख्याधिकारी ही कार्यशाळेत सहभागी झाले होते.
यावेळी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य पराग पाटील यांनी त्रयस्थ पक्षांचे लेखापरीक्षण करतांना आवश्यक कागदपत्रे, नियम व तांत्रिक बाबींविषयी माहिती दिली. स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख व्ही.टी.पाटील यांनी बांधकामांची गुणवत्ता राखतांना घ्यावयाची दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. संकल्पचित्र तज्ज्ञ मिलिंद राठी यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने बांधकामासाठी कृत्रिम वाळूचे महत्त्व याविषयावर मार्गदर्शन केले. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अभियंत्यांनी स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवावे. असे शब्दात बांधकाम व्यावसायिक भरत अमळकर यांनी मार्गदर्शन केले. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी शासकीय कामांचे बांधकाम करतांना लागणाऱ्या गौण खनिजांच्या परवान्यांसाठीची कार्यपद्धती व शासनाच्या अलीकडील सूचनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस बसविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
वेळेत गुणवत्तापूर्ण काम करा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
कार्यशाळेच्या समारोप सत्रात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व अभियंत्यांशी बांधकाम करतांना घ्यावयाच्या स्थापत्य विषयक दक्षतेवर सहज संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांचे स्थापत्य विषयक तांत्रिक ज्ञान पाहून उपस्थित आवाक झाले.
श्री.प्रसाद म्हणाले, कामांचे आदेश व एजन्सीची नेमणूक केली म्हणजे जबाबदारी संपत नाही. वेळेवर गुणवत्तापूर्ण काम करण्याची जबाबदारी तुमची आहे. कामांचे डिझाईन, मटेरियलची तपासणी करा. बांधकाम साईटवर कुशल कामगारच काम करीत आहेत. याची स्वतः खात्री करावी. बांधकामासाठी चोरीच्या गौण खनिजांचा वापर करण्यात येऊ नये. कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत तीन वेळा भेट द्यावी. मार्च २०२४ अखेर किती कामे पूर्ण होऊ शकणार नाही, याची माहिती १० नोव्हेंबरपर्यंत देण्यात यावी. कामांचे भूमिपूजन संविधान दिन २६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावे. भूमिपूजनासाठी पालकमंत्री, जिल्ह्यातील मंत्री, आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची वेळ घेण्यात यावी. २६ जानेवारी २०२४ पर्यंत छोट्या स्वरुपातील सर्व कामे पूर्ण करण्यात यावी. कामांच्या ठिकाणी कोनशीला लावतांना जिल्हाधिकारी कार्यालयातील राजशिष्टाचार विभागाची परवानगी व मान्यता घेण्यात यावी असे ही त्यांनी सांगितले.
श्री.प्रसाद म्हणाले, ठेकेदारांकडून २५ लाखांच्या वरील कामांचा गॅंट चार्ट (gantt chart) तयार करून घेण्यात यावा. ५० लाखांच्या वरील कामांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून लेखापरीक्षण केले जाणार आहे.
गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्यांना बक्षिस
१५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करणाऱ्या शाखा, उप व कनिष्ठ अभियंत्यांना बक्षिस देऊन गौरव केला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
Discussion about this post