जळगाव । महाराष्ट्रातील उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे, यात जळगाव जिल्हा सुद्धा अपवाद नाही. उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे जळगाव जिल्ह्यातील तापमान खूप खाली घसरले आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील किमान तापमान ७ ते ८ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहिले आहे.
हवामान विभागानुसार, आगामी एक ते दोन दिवस जिल्ह्यात थंडीचा जोर कायम राहील. मात्र, त्यानंतर काही दिवस थंडी कमी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात काही प्रमाणात थंडी पडली होती, परंतु काही दिवस थंडी गायब राहिली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्यभरातून थंडी गायब झाली होती. फेंगल वादळाचा जोर कमी झाल्यानंतर मात्र जिल्ह्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे.
गेल्या आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढला असला तरी, हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी दोन दिवसांनंतर, विशेषत: २० डिसेंबरनंतर जिल्ह्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज आहे. काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण होऊन, रात्रीचा पारा १२ ते १३ अंश सेल्सियसवर येऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.















Discussion about this post