मुंबई । राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांकडून बहुतांश उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान या यादीत आपलं नाव यावं यासाठी अनेक उमेदवारांकडून अजूनही प्रयत्न सुरू आहेत. मात्र याच दरम्यान काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्या एक्स पोस्टची सध्या मोठी चर्चा सुरू आहे.
काँग्रेस पक्षाकडून 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. मात्र, ही तिसरी यादी जाहीर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली उमेदवारी माघारी घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे. वांद्रे पूर्व येथून उमेदवारी मागितली होती, पण अंधेरी पश्चिममध्ये उमेदवारी मिळाली, असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय.
सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलेय ?
मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तीथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो.