चोपडा । अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून एका अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना चोपडा शहरातील पंचायत समितीसमोर असणाऱ्या सभापती निवासाच्या प्रांगणात घडली. दरम्यान घटनेतील मृतांची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या चार तासातच मारेकरी संशयितास गोरगावले रोड परिसरातून ताब्यात घेतले. सदरची घटना २३ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती.
घटनेतील मयताचे वय अंदाजे ४० वर्ष असून मयत हा कचरा गोळा करणारा व्यक्ती असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित राजेश काशीराम बारेला (वय ३३) व याच्यासह अन्य एक महिला भंगार व कचरा वेचण्याचे काम करतात. रात्री दोघे शहरातील अल्पबचत भवनजवळ रहिवास करीत होते.
दरम्यान शुक्रवारी रात्री त्याच ठिकाणी अज्ञात व्यक्ती आला. यानंतर अज्ञात व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून राजेश बारेला याने संतापाच्या भरात अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. यात सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर राजेश बारेला व महिला हे दोघेही तेथून निघून गेले होते. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
घटना समोर आल्यानंतर चार तासांत सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपी राजेश काशीराम बारेला यास गोरगावले रस्त्यावरून ताब्यात घेतले आहे. संशयिताने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. हा खून अनैतिक संबंधातून झाला असून, मृताची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
Discussion about this post