जळगाव । जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला थेट ट्रॅक्टरखाली ओढून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. यात तलाठी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर मालक आणि चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील नदी पात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपसा रोखण्याची कारवाई करण्यात येत होती. महसूल विभागाचे पथकाला त्या ठिकाणी काही ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करत असल्याचे दिसले. कारवाई करताना अंधाराचा फायदा घेऊन इतर वाहने पसार झाले. मात्र एक ट्रॅक्टर पथकाच्या हाती लागला होता. पथकाच्या हाती लागलेला ट्रॅक्टर जप्त करून तहसीलदार कार्यालयात नेण्यात येत होता.
त्यावेळी ट्र्रॅक्टरवर जडे आडनावाचे तलाठी बसले होते. त्यावेळी चालक आणि मालकाने त्यांना ट्रॅक्टरवरून खाली खेचले. त्या दोघांनी तलाठ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तलाठी जडे यांना जोरदार मार लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
याबाबतची अधिकच्या माहितीनुसार, बुधगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास अवैध वाळू उपसा केला जात आहे, याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली. या माहितीच्या आधारे मंडल अधिकारी, तलाठी आणि इतर ५ कर्मचारी त्या ठिकाणी गेले. त्यावेळी त्यांना काही वाहने दिसून आली पण अंधाराचा फायदा घेऊन काही वाहने तेथून पसार झाली. मंडल अधिकारी आणि तलाठ्यांच्या हाती एक ट्रॅक्टर लागला. हा ट्रॅक्टर तहसीलदार कार्यालयाकडे घेऊन येत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.















Discussion about this post