पुणे । पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंचे जावई व रोहिणी खडसेंचा नवरा डॉ प्रांजल खेवलकरला अटक करण्यात आल्याच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये निशाणा साधला आहे. अशातच रेव्ह पार्टी प्रकरणाची माहिती देत पोलिसांकडून एक प्रेसनोट देखील जारी करण्यात आली या प्रेसनोटचा फोटो शेअर करत भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
या प्रकरणावरुन भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. “ओऽऽऽबाबो १२मतीच्या मोठ्ठया ताई…वाचली का पुणे पोलिसांची प्रेसनोट…वाजंत्रीताईचा नवरा प्रांजल खेवलकरच्या रेव्ह पार्टीत तब्बल 42 लाख रुपयांचे कोकेन (ड्रग), गांजा, 10 मोबाईल, गाडी तसेच 22, 23 वर्षाच्या मुलीसोबत होत्या…आता म्हणू नका की हे सत्ताधाऱ्यांचे राजकारण आहे, राजकीय षडयंत्र आहे. जे आहे त्याचे व्हिडिओ पुरावे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
‘वाजंत्री ताईंनी आधी स्वत:च्या घराकडे लक्ष द्यावे’
याशिवाय त्यांनी रोहिणी खडसे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेत सरकारला जबाबदार धरणाऱ्या, आमच्या नावाने कायम तुतारी वाजवणाऱ्या वाजंत्री ताईंनी आधी स्वत:च्या घराकडे लक्ष द्यावे आणि हो, तुमचा नवरा लहान नाही की त्याला कोणी उचलून आणून रेव्ह पार्टीत बसवेल नाही, तर यात ही पुन्हा सरकारलाच जबाबदार धराल”, असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसेंना लगावला.
“राज्यात जेव्हापासून देवाभाऊंचे भाजपा-महायुतीचे सरकार आलंय, तेव्हापासून ड्रग्सची प्रकरणे बाहेर येत आहेत. आधी ती बेमालूमपणे का लपवली जायची? कोण लपवायचे, याचे गूढ इथेच कुठेतरी दडलं आहे की काय? असा प्रश्न महाराष्ट्राला पडतोय. गुन्हे उघड झाल्यावर वाजंत्रीताई चोराच्या उलट्या बोंबा मारायला पुढे येतात हेही गुपित उघड झालं”, असेही चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे.
Discussion about this post