भुसावळ । महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आलीय. बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या तस्करीचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. यात 30 अल्पवयीन मुलांची मनमाडमध्ये तर 29 लहान मुलांची भुसावळ रेल्वे स्थानकावर सुटका करण्यात आली. याप्रकरणी एकूण पाच जणांवर कलम 470 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लहान मुलांना पुणे किंवा सांगलीतील मदरशात नेण्याचा प्लॅन होता, अशा संशय रेल्वे पोलिसांना आहे. यामधील काही मुलांची रवानगी नाशिकच्या उंटवाडी परिसरातील बालसुधार गृहात करण्यात आली आहे.
बिहार राज्यातून पूर्णिया जिल्ह्यामधून सांगली येथील मदरशामध्ये तस्करी करुन नेण्याचा डाव भुसावळ रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने हाणून पाडला आहे. दानापूर-पुणे एक्स्प्रेस मधून तस्करी करून नेण्यात येणाऱ्या 59 मुलांची भुसावळ ते मनमाड स्थानकादरम्यान 30 मे रोजी सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
सदर मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सदरहू पाच संशयित तस्करांविरुद्ध भुसावळ आणि मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांच्या पालकांची माहिती काढली जात असून ओळख पटविल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
Discussion about this post