मुंबई । मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवलं असून या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आल्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता मराठा समाजाला नोकरीत तसेच शिक्षणात १० टक्के आरक्षण मिळणार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लवकरच कायदा करण्यात येणार असून आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी सरकारकडून विशेष खबरदारी देखील घेतली जाणार आहे. आधीच्या त्रुटी दूर करून आम्ही आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत नक्कीच टिकणार, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे. मी दिलेला शब्द पाळतो. त्यामुळेच लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. आम्ही दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही वचनाची पूर्तता केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या एकजुटीचा आणि लढ्याचा हा विजय आहे. आजचा दिवस इच्छापूर्तीचा आहे. हा मराठा समाजाचा, मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा चिकाटीने दिलेल्या लढयाचा विजय आहे, असं सांगतानाच लाखो करोडो मराठा बांधवांनी आपल्या हक्कांसाठी लढा देताना आजवर संयम सोडलेला नाही. शिस्त मोडली नाही. याबद्दल मी संपूर्ण मराठा समाजाचे, तरुण-तरुणींचे आभार व्यक्त करतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.