मुंबई । विधानभवनाच्या लॉबीत आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीमुळे चहूबाजूंनी टीका केली जात आहे. या हाणामारीचे पडसाद पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशीही उमटले. विधानपरिषदेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मानिय सदस्यांना राज्यातील जनतेच्या मनात या घटनेच्या काय प्रतिक्रिया उमटल्या याची जाणीव करून दिली.
कालच्या घटनेने कोणा एका व्यक्तीची प्रतिष्ठा खराब झालेली नाही. इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आज बाहेर ज्या काही शिव्या पडत आहेत. त्या एकट्या पडळकर किंवा यांच्या माणसाला पडत नाही. आपल्या सगळ्यांच्या नावे याठिकाणी बोलले जाते, हे सगळे आमदार माजले आहेत, असे म्हटले जात असल्याच्या कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिल्या. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करून आपण राज्यातील जनतेला काय सांगणार आहोत, अशाप्रकारे समर्थन करणे योग्य होणार नसल्याचे ते म्हणाले.
ही विधानसभा आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या मालकीची नाही. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या मालकीची ही विधानसभा आहे. समाजाला दिशा देणारे काम झाले पाहिजे. पण विचारातून चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथा बुक्क्यांचा संदेश जात असेल तर सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे आपण दोघांना सांगितले व त्यांनी खेद व्यक्त केला. शब्दातून निघणारे विष हे नागाच्या विषापेक्षा अधिक विषारी असते, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.
आपण माणसं आहोत, राग अनावर होतो. पण आपला चर्चेचा स्थायीभाव हा डिस्कशन असावा कुणी मीडियासमोर अश्लील बोलत आहे. कुणी अध्यक्षांसमोर अध्यक्ष मॅनेज असल्याचे बोलत आहे. नियमाने याठिकाणी ४५ लक्षवेधी होण्याची गरज आहे. २०० लक्षवेधी घेत आहोत. अशावेळी जी भाषा आपण वापरतो, ती योग्य नाही. तिसरी भाषा कुठल्या वर्गात शिकायची, हे समिती ठरवेल. पण आपण त्रिसूत्री ठरवावी लागेल. संसदीय परंपरा, भाषेचे पालन व सातत्याने संवाद ठेवावा लागेल, याचे भान त्यांनी सदस्यांना करुन दिले.
Discussion about this post