जळगाव । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा जळगाव दौऱ्यावर येत आहे. त्यांचा ३ जूनला संभाव्य जळगाव जिल्हा दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात ७५ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री जळगावमध्ये येणार आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची निवड प्राधान्याने करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी (ता. २२) दिल्या. जिल्हाधिकारी मित्तल म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांतील ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे ध्येय आहे.
या अभियानाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची यादी तयार करावी.
या योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष आदी माहिती सर्वसमान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी. प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्याकडून अर्ज भरून घ्यावेत व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागांच्या १०० लाभार्थ्यांना उपस्थित ठेवण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता लक्षात घेता त्यांची बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी आवश्यक त्या सोईसुविधांचे नियोजन करावे.
Discussion about this post