मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमण झाली आहे. पवारांना काही झाले तर गृहखातं त्याला जबाबदार असेल असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. तर पवार यांना धमकी देणारा मास्टरमाइंड कोण, त्याचा वेळीच बंदोबस्त करा, असे अजित पवार म्हणाले. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विटमध्ये काय म्हटलं?
शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. याप्रकरणी मी स्वतः वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत, आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल. असही ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. @PawarSpeaks हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल.…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 9, 2023
शरद पवारांना दिलेली धमकी काय?
राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. तर सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे. आयुष्यभर सुपारी कात्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकडं होऊन मेलं म्हणते हे खरं आहे का? असं असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार म्हणजे, अशी धमकी सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली होती.
Discussion about this post