मुंबई | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सत्तेत घेऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिले होते. त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ही खळबळ उडालेली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. सध्या केवळ प्रकृतीच्या कारणावरून ते जामिनावर तुरुंगातून बाहेर आहेत. त्यांना कोर्टाने अद्याप निर्दोष ठरविलेले नाही. त्यामुळे, त्यांच्याविषयीची आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे. सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरुन नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
आम्ही सहमत
आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा सर्वस्वी त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहीत व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आलेले आहेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुना आम्ही परस्पर सहमतीनेच ती भूमिका घेतलेली आहे, असं सांगतानाच जनहिताचा, लोकभावनेचा आदर करून अजितदादा पवार योग्य भूमिका घेतील, अशी आशाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
Discussion about this post