मुंबई । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नेते मंडळींच्या प्रचार सभेला रंगत आली असून याच दरम्यान शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला. पवारांनी भुजबळांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला जोर आला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
2004 साली भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही, पण असं नेमकं का करण्यात आलं यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं. 2004 मध्ये भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. छगन भुजबळांना नंतर तुरुंगात जावं लागलं, एका एका वृत्तपत्राला मुलाखत देतेवेळी पवारांनी हा गौप्यस्फोट केला.
‘2004 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत (तत्कालीन) राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्रिपद कॉंग्रेसकडे दिलं. तेव्हा ‘सिनिअर’ म्हणून माझ्यापुढे नाव होतं छगन भुजबळांचं. भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा. त्यांना तुरूंगात जावं लागलं. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं, तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती’, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला.
2004 मध्ये मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे न गेल्याची खदखद अजित पवार यांनी सातत्यानं विविध प्रसंगी बोलून दाखवली. ज्याविषयी सांगताना शरद पवार यांनी काही गोष्टी स्पष्टच करत आपण मंत्रीपदं जास्त घेतल्याचं त्यांनी सांगितलं. ‘आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील हे तरूण पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले’, असं सांगताना नव्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले असले आणि त्यांचा पक्ष वेगळा असला तरीही आपण गांधी- नेहरुंच्या विचारांचे प्रणेते असल्यानं गोष्टी योग्य घडल्या, किंबहुना ओबीसींनाही सत्तेत स्थान मिळावं या मतामुळं भुजबळांनाही बळ दिल्याचं पवारांनी स्पष्टच सांगितलं.















Discussion about this post