मुंबई । अधिवेशनात मोबाईलमध्ये रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत सापडलेले माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्री खाते बदलले आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा व युवक खाते देण्यात आले आहे, तर माणिकराव कोकाटे यांच्या कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले. मात्र यातच कृषी खात्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कृषिमंत्रिपदाची सर्वात अगोदर मला ऑफर देण्यात आली होती, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना यांनी कोकाटे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केले. तसेच त्यांनी या मंत्रिपदाविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर मला दिली होती. मात्र कृषीमंत्री या पदाला ग्रामीण भागातील व्यक्ती या पदाला जास्त न्याय देऊ शकते, अशी माझी त्यावेळी भूमिका होती, असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला. तसेच कुठलेही खाते लहान मोठे नसते. आपण काय काम करतो यावर सगळे अवलंबून असते, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयावरही त्यांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेत असतात. यावर मी अधिक बोलणं योग्य राहणार नाही. – याआधी देखील अनेक नेते कृषिमंत्री राहिलेले आहेत. शरद पवार यांनीदेखील देशाचे कृषीमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. राजीनामा मागणे हे विरोधकांचे कामच आहे, अशा भावना यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केल्या.
Discussion about this post