ज्याची उत्सुकता प्रत्येक भारतीयांसाठी होती तो क्षण अखेर आला. चांद्रयान-३ ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केले आहे. हे यश मिळवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. 140 कोटी लोकांच्या प्रार्थना आणि इस्रोच्या 16,500 शास्त्रज्ञांच्या चार वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले. आता संपूर्ण जगच नाही तर चंद्रही भारताच्या हातात आहे.
भारतीय यान यशस्वीपणे चंद्रावर उतरवण्याचा महत्त्वाचा टप्पा आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी पार पडला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला. चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला होता तो खरा करुन दाखवला आहे.
इस्त्रोनं सतीश धवन प्रक्षेपण केंद्र श्रीहरी कोटा येथून १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चे प्रक्षेपण केलं होतं. त्यानंतर आज म्हणजेच २३ ऑगस्टपर्यंत प्रत्येक पातळीवर भारताला यश मिळालं होतं. यावेळी भारतानं ऑर्बिटर न पाठवता प्रॉपल्शन मॉड्यूल पाठवलं होतं. त्यामध्ये देखील अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक राहिले. या इंधनाचा उपयोग करून हे मॉड्यूल चंद्राभोवती पुढील किमान सहा महिने फिरत राहून पृथ्वीचा अभ्यास करेल.
Discussion about this post