जळगाव । महात्मा ज्योतीबा फुले स्मृतीदिन (२८ नोव्हेंबर) ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) हे नऊ दिवस संविधानाची जाण नव्या पिढीत निर्माण करण्यासाठी नव्या प्रकारची नवरात्र म्हणून साजरे केली जावी अशी अपेक्षा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु डॉ.एन.के.ठाकरे यांनी व्यक्त केली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळे अंतर्गत असलेल्या बौध्द अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.ठाकरे यांचे “संविधान:एक आकलन” या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी होते. यावेळी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांच्या हस्ते डॉ.एन.के.ठाकरे यांच्या ‘निंबोळ’या कथा संग्रहाचे प्रकाशन झाले. मंचावर प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु.पगारे उपस्थित होते.
डॉ.ठाकरे आपल्या व्याख्यानात म्हणाले की घटनेप्रमाणे देश चालणार नसेल तर राज्य आणि देश पारतंत्र्यात जाईल. कोणतेही राज्यकर्ते चातुर्वण्य व्यवस्था मिटली पाहिजे याबद्दल बोलत नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रवाही घटना लिहीली. मात्र त्यावरही काही जण चुकीचे आक्षेप घेत आहेत. प्रत्येक माणसाचा विचार घटनेत झालेला आहे. विषमतेवर मात करुन लोकशाही वाढविणे हे त्यांना अभिप्रेत होते. आपला समाज हा रितीरिवाज, अंधश्रध्दा यामुळे अंध झाला असुन विचार करायला तयार नाही. अशी खंत डॉ.ठाकरे यांनी व्यक्त केली.
डॉ.के.बी. पाटील यांनी या देशातील लोकशाही टिकण्याचे श्रेय राज्य घटनेला दिले पाहिजे असे सांगुन घटनेच्या वर जात – धर्म – पंथ आणून व्यक्तीपूजा केली जात असल्यामुळे भविष्यात तरुण पिढीचे काय होईल व लोकशाही टिकेल की नाही याची भिती वाटते असेही ते म्हणाले.अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.माहेश्वरी यांनी तरुणांच्या या देशात आई-वडील, शिक्षक आणि महापुरुष हे आदर्श असणे गरजेचे आहे. त्यातुन देश विकसीत होईल असे मत व्यक्त केले. प्रारंभी प्रा.म.सु.पगारे यांनी प्रास्ताविक केले. भालचंद्र सामुद्रे यांनी अभिवाद गित सादर केले. प्रा.दीपक खरात यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. डॉ.संतोष खिराडे यांनी आभार मानले.
Discussion about this post