चाळीसगाव । जळगावच्या तालुक्यातील हिरापूर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव आयशर वाहनाने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात हिरापूर येथील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ सख्ख्या भावांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेमुळे हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी जळगाव–चांदवड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. या प्रकरणी ट्रकचालकाविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव–नांदगाव रस्त्यावर हिरापूर गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात सोमनाथ संजय वराडे (वय ३२), सागर संजय वराडे (वय २६) आणि त्यांचा मित्र विकी बापूराव खैरनार (३०) या तिघांचा मृत्यू झाला. तिघेही जण होंडा शाईन मोटार सायकल क्र. MH 05 Z 8909 या दुचाकीवरून तळेगाव येथून हिरापूरकडे येत होते. त्यावेळी तळेगांवकडून हिरापूरला येत असतांना रात्री 09.30 वाजेच्या सुमारास चाळीसगाव कडून नांदगांवकडे जाणारा टाटा कंपनीचा ट्रक क्र. MH 04 HY 7208 चे वरील चालकाने ट्रक बेदकारपणे, भरधाव वेगात चालवून दुचाकीला समोरून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला.
घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमनाथ संजय वराडे, सागर संजय वराडे आणि त्यांचा मित्र विकी बापूराव खैरनार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेनं ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव इथं पाठवण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांनी तपासून सोमनाथ संजय वराडे, सागर संजय वराडे आणि त्यांचा मित्र विकी बापूराव खैरनार यांना मयत घोषित केलं. या प्रकरणी ट्रकचालकाविरोधात वराडे कुटुंबियांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.















Discussion about this post