चाळीसगाव | तालुक्यातील शिवापूर तांड्यावरून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. येथील शेतकरी दांपत्याने स्वतःच्या शेतात एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. भगवान पोपट जाधव (वय ३८) आणि आशाबाई भगवान जाधव (वय २७) अशी मृतांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, जाधव दांपत्याने घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात जाऊन उंबराच्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेतला. ही बाब काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांना खाली उतरवले आणि चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले.
या दांपत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही शिक्षणासाठी गावाबाहेर राहत असल्याने घटनेवेळी घरी नव्हते. आई-वडिलांच्या अचानक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे दुःख ओढवले आहे.
घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रविण सपकाळे करीत आहेत.















Discussion about this post