जळगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी मालेगाव रोडवरील धुळे–छत्रपती संभाजीनगर बायपास चौफुली येथे वाहनांची तपासणी करताना २४ लाख ६९ हजार १५० रुपये किमतीचा ४२ किलो ५८३ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बुधवार (दि.30) रोजी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलिसांकडून रात्रीची गस्त करत असताना नाकाबंदीमध्ये ही कारवाई करण्यात आली. मारुती स्विफ्ट डिझायर (MH 12 KN 2305) या पांढऱ्या रंगाच्या वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या डिकीत निळ्या रंगाच्या चार प्लास्टिक पिशव्यांमध्ये गांजा आढळून आला. या प्रकरणी शेख नदीम शेख बशीर (वय ४०, रा. गुलवानी खालदा, गल्ली क्र. ३, मालेगाव, जि. नाशिक) याला घटनास्थळीवरुन ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजासह तस्करीसाठी वापरलेले वाहन देखील जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, तपासादरम्यान पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारचा गांजा साठवून ठेवण्यात आला आहे. त्यानुसार कन्नड पोलिसांनी छापा टाकून तेथून सुमारे ४५० किलो गांजा जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, योगेश माळी, कैलास पाटील, अरुण बाविस्कर, तसेच पोलीस कर्मचारी राहुल सोनवणे, विनोद पाटील, योगेश बेलदार, अजय पाटील, भूषण पाटील, राकेश पाटील, नितीन आगवणे, महेंद्र पाटील यांनी ही कारवाई केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता शनिवार (दि.3) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Discussion about this post