चाळीसगाव । परतीच्या पावसामुळे मक्याचे नुकसान झाले. शिवाय त्यात कपाशीला देखील भाव मिळत नसल्यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्याने घरातच वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे येथे उघडकीस आली. चंद्रसिंग पंडित जाधव (वय ४६) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
यंदाचा पावसाळा नुकसानकारक ठरला आहे. अगदी सुरवातीपासूनच जोरदार पावसाळा सुरवात झाल्यानंतर अधूनमधून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत होता. शेतातील पिके देखील पुरामुळे पाण्याखाली गेली होती. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. याशिवाय शेतातून आलेल्या मालाला देखील चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश आहे.
चंद्रसिंग जाधव यांनी आपल्या शेतात मक्याची लागवड केली होती. मात्र, परतीच्या पावसामुळे मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात कपाशीला भाव नसल्याने जाधव हताश झाले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान चंद्रसिंग जाधव हे ५ नोव्हेंबरला पहाटे चारच्या सुमारास घरच्यांना घरात आढळून आले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, घराच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू असलेल्या खोलीतच त्यांनी वायरच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबत शेखर जाधव याने दिलेल्या माहितीवरून येथील पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.